१०० अजित पवार भाजपला कसे झेपणार ?
भान सुटलं की स्वत:च्याच धोतरात लोक पाय अडकून पडतात

लोकवार्ता । प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोप चालू आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून सतत विरोधकांना कानपिचक्या मारण्यात येतात. खासदार संजय राऊत यांनीही रोखठोक या त्यांच्या सदरात चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केलीय.
कालच पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांना पवारांवरून टोला लगावला होता. त्याला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादीवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस असे १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”, असं विधान केलं होतं.
त्यावरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पाटील म्हणतात शंभर अजित पवार घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गंमतीचंच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या ७२ तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार?”, असा टोला त्यांनी पाटलांना लगावला आहे.
“भान सुटलं की स्वत:च्याच धोतरात लोक पाय अडकून पडतात”
“ईडीच्या नावे धमक्या द्यायच्या आणि चिखलफेक करायची हेच चंद्रकांत पाटील यांचं काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते. सामनातील एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त करून खरमरीत पत्र पाठवलं. त्यात भूमिका कमी आणि जळफळाटच जास्त आहे. लिहिता, बोलताना भान सुटले की स्वत:च्याच धोतरात लोक कसे पाय अडकून पडतात ते या पत्रावरून दिसते”, असं राऊत यांनी सदरात म्हटलं आहे.