गायत्री ग्रुप ऑफ स्कूल तर्फे इ.१० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोकवार्ता : विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कुल मोशी, गायत्री इंटरनॅशनल स्कूल व जूनियर कॉलेज ,चऱ्होली, मंजुरीबाई विद्यालय ,दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०२१-२२ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार महेशदादा लांडगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अमूल्य मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी सांगत प्रशासकीय सेवेमध्येही प्रवेश करावा असे आवाहन केले. संस्थाध्यक्ष श्री. विनायक भोंगाळे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वतःशीच स्पर्धा करावी व आत्मचिंतन करून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा.
तसेच ‘वाचाल तर वाचाल’ या संकल्पनेला पुढे ठेवून या उपक्रमाविषयीही उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी काही उत्साही पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर माननीय संस्थाध्यक्ष यांच्या विचार मंथनातून व प्रेरणेतून वरील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘काव्यमंच’ चा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच काव्यमंच उपयोगी ठरेल असे मत संचालिका कविताताई भोंगाळे कडू पाटील यांनी व्यक्त केले.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या या समारंभात भोसरी विधानसभेचे आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. प्रमुख पाहुणे म्हणून पिं.चि. प्रशासन अधिकारी श्री. संजय नाईकडे, मुख्याध्यापक श्री. हनुमंत कुबडे, मुख्याध्यापक श्री. रामदास थिटे , श्री.मुरलीधर साठे, श्री. दिगंबर ढाेकले, यांनी हजेरी लावली. गणेशवंदनेने सुरू झालेल्या या समारंभात बाेर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेल्या सर्वच शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव ,श्री. संजय भोंगाळे ,संचालिका साै.कविता कडू पाटील, साै.सरिता विखे पाटील , कार्यकारी संचालिका साै.काजल छतिजा तसेच सर्व शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.श्री. भरत बारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर साै. कामिनी चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.