लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

१८ हजार कोटींचा व्यवहार, २७०० कोटी कॅश आणि ५ वर्षांसाठी…; ‘एअर इंडिया’ साठी टाटा-मोदी सरकारमध्ये काय Deal झालीय पाहा

टाटा पुन्हा होणार मालक

लोकवार्ता । प्रतिनिधी

तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’ला अखेर नवीन मालक मिळाला आहे. सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सरकारला या व्यवहारामधून १२ हजार ९०३ कोटींची अपेक्षा असताना टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत. सरकार आणि टाटांमधील या करारासंदर्भातील महत्वाची माहिती पांडे यांनी दिल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

या व्यवहारामधील अटी आणि शर्थींसंदर्भातील माहिती ‘दिपम’च्या सचिवांनी दिली आहे. टाटांनी १८ हजार कोटींची बोली लावली होती. ज्यामध्ये १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे. हे कर्ज वगळता बाकी रक्कम टाटा कंपनी रोख देणार आहे.

टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रॅण्डमध्ये तसेच लोगोमध्ये पुढील पाच वर्षे कोणतेही बदल करता येणार नाही. तसेच पाच वर्षांनंतर काही हस्तांतरण करायचे झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावं लागणार आहे अशी अट घालण्यात आलीय.

टाटांना पुढील एका वर्षासाठी एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करता येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ते कर्मचाऱ्यांना व्हीआरएसच्या माध्यमातून कंपनीमधून कमी करु शकतात, असं सांगण्यात आलंय.

टाटा सन्सने १८ हजार कोटींची बोली एअर इंडियासाठी लावली. सरकारने एअर इंडियासाठी रिझव्ह प्राइज १२ हजार ९०६ कोटींची ठेवली होती, अशी माहिती देण्यात आलीय.

सरकारला दोन हजार ७०० कोटी रुपये टाटांकडून रोख दिले जाणार आहेत. या मोबदल्यात सरकार आपला कंपनीतील १०० टक्के वाटा टाटांच्या नावे करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

केंद्रीय मंत्रीगटाने या बोलीला मंजूरी दिली असून एकूण दोन कंपन्यांनी बोली लावल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे. ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी दोन निविदा सरकारकडे आल्या होत्या. टाटांबरोबरच ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झालंय.

२०२० पासून सुरू केलेली प्रक्रिया
‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

टाटा पुन्हा होणार मालक
‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा’कडे जाणार असल्याने त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani