प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथे नवीन अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार
लोकवार्ता: वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे मोशी भागासाठी उभारण्यात आलेल्या अग्निशामक केंद्रानंतर आता प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथे नवीन अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. तब्बल 1 कोटी 30 लाख 7 हजार 55 एवढी रक्कम खर्चून बांधण्यात येणाऱ्या अग्निशामक केंद्रामुळे चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघीपर्यंतच्या भागात घडणाऱ्या आगीची घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. उद्योग, व्यवसाय आणि नोकरीसाठी तरुणांचा शहराकडे ओढा असल्यामुळे लगतच्या ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होत आहे. वाढती लोकसंख्या आणि घडणाऱ्या आगीच्या घटना विचारात घेऊन शहराच्या प्रत्येक उपनगरासाठी अग्निशामक यंत्रणा करण्याची आवश्यकता भासत आहे. त्यानुसार मोशी भागात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संत तुकारामनगर येथील अग्निशामक केंद्रावर अवलंबून रहावे लागत होते.
मोशी आणि संत तुकारामनगरमधील भौगोलिक अंतर मोठे असल्यामुळे आगीची तीव्रता वाढून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागासाठी स्वतंत्र अग्नाशामक केंद्र उभारले आहे. आता महापालिकेने चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी आणि दिघीपर्यंतच्या भागासाठी नवीन अग्निशामक केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे.महापालिकेचा प्रभाग क्रमांक उ चऱ्होली, चोविसावाडी येथील आरक्षित भूखंडावर अन्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे.
चऱ्होली भागात हाऊसिंग सोसायट्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोविसावाडी, वडमुखवाडी भागातून आळंदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक मोठमोठी दुकाने सुरू झाली आहेत. पुढे इंद्रायणी नदीपात्रालगत शेतीचा परिसर देखील मोठ्या प्रमाणात आहे. खाणींच्या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे परिसरात दुर्घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यासाठी महापालिकेने चोविसावाडी भागात अग्निशामक केंद्राची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुढील दोन वर्षात या भागामध्ये अग्निशामक केंद्र सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.