पिंपरी चिंचवडमधील विद्यापीठास पद्मविभूषण शरद पवार यांचे नाव द्यावे – समिताताई गोरे
लोकवार्ता : राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात काल पिंपरी चिंचवड मध्ये विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात निर्णय झाला. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्या वतीने स्वागत करण्यात आले. या विद्यापीठास पद्मविभूषण शरद पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्या अध्यक्षा समीता गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

समिता गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केली आहे. राज्यात आघाडी सरकार असताना पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूला विविध विद्यापीठांसाठी म्हणून जागा देण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता, परंतु नंतरच्या काळात या निर्णयाला गती मिळाली नव्हती. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र विद्यापीठ करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र हे विद्यापीठ स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. शासनाने या विद्यापीठास नुसती मान्यता देऊन चालणार नसून विद्यापीठाचा अर्थसहाय्य देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी समिता गोरे यांनी केली आहे.
तसेच देशाचे नेते पद्मविभूषण शरद पवार यांचा नुकताच ८३ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांनी या देशासाठी आजवर केलेल्या योगदानाबद्दल राज्यातील जनतेच्या वतीने शरद पवार यांना भेट म्हणून पिंपरी चिंचवड विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे असे समिता गोरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.