पिंपरी महापालिका उपायुक्तपदी साताऱ्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बापट यांची पंढरपूर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली होती

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांची वरळी नगरपालिकेत बदली झाली आहे. त्यांना आज पिंपरी चिंचवड महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले. सद्यस्थितीत चितळे यांच्याकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचा कार्यभार होता. त्यांच्या जागेवर उपायुक्त म्हणून सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट येणार आहेत. याला महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दुजोरा दिला आहे.

सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पदोन्नतीने पिंपरी चिंचवड पालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बापट यांनी यापूर्वी कामकाज केले होते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बापट यांची पंढरपूर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागी शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या बदलीनंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या बापट यांच्याकडे पुन्हा सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली.
बापट यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी सातारा शहराच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. नगरविकास विभागाने नुकतीच त्यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत पदोन्नतीने उपायुक्त या पदावर बदली केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांची वरळी नगरपालिकेत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर उपायुक्त म्हणून बापट यांना पदोन्नती देण्यात आली आहे. चितळे यांच्याकडे यापूर्वी पालिकेच्या भांडार विभागाची जबाबदारी होती. तर सद्यस्थितीत ते आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी सांभाळत होते.