पत्नीचा खून करुन २७ वर्षे फरार आरोपी अखेर गजाआड; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी
पिंपरी : राजू वारभुवन (प्रतिनिधी) – पत्नीचा खून करून तब्बल २७ वर्ष पोलिसांना गुंगारा देत नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केले आहे. ही कारवाई पोलिसांनी आरोपीच्या उस्मानाबाद येथील मूळ गावी जाऊन केली आहे. रामा पारप्पा कांबळे (वय ६६, रा. कोळनुर पांढरी ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो १९९५ पासून पत्नीचा खून करुन पसार झाला होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडी उकळ डोक्यात आणि छातीवर मारुन आरोपी रामा कांबळे याने १९९५ मध्ये त्याची पत्नी सुशिलाबाई रामा कांबळे यांचा खून केला होता. खून करून तो पसार झाला होता. तसेच वारंवार पोलिसांना मागील २७ वर्षांपासून गुंगारा देत होता. या दरम्यान गुन्हे शाखा युनिट १ चे एक पथक काही दिवसांपूर्वी ३५४ मधील आरोपी महेश भिमराव कांबळे याला अटक करण्यासाठी आरोपी रामा कांबळे राहत असलेले गाव कोळनुर येथे गेले होते.
यावेळी पोलिसांनी महेश कांबळे याला अटक केली. तर रामा देखील याच गावचा असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी रामा याच्याबाबत गावात विचारपूस केली असता त्याने दुसरा विवाह केला असून नाव बदलून मावळातील उर्सें येथे राम कोंडीबा बनसोडे या नावाने तेथील वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेचच उर्से येथे जाऊन आरोपी रामा कांबळे याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने एका मुक्या महिलेसोबत विवाह केला असून त्याला तीन मुले असल्याचे सांगितले. तसेच १९९५ साली भोसरी येथील राहत्या घरी त्यानेच त्याची पत्नी सुशिलाबाईचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रामा याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
२७ वर्ष उघडकीस न आलेल्या किचकट गुन्ह्याची उकल पोलीस आयुक्त विनोय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस उप निरीक्षक कानडे, पोलीस हवालदार मुल्ला, पोलीस हवालदार बोऱ्हाडे, पोलीस हवालदार कमले, पोलीस नाईक हिरळकर, पोलीस नाईक मोरे, पोलीस शिपाई जायमाई, सरोदे, रूपनवर यांच्या पथकाने केली आहे. तांत्रीक विश्लेषण हे तांत्रीक शाखेचे पोलीस हवालदार नागेश माळी यांनी करून तपास पथकास विशेष सहकार्य केलेले आहे.