२५ टन मटण, चिकनची दररोजच्या कचऱ्यात भर
भटकी कुत्री फेकलेले चिकनचे तुकडे रस्त्यावर नेत असल्याने दुचाकीस्वारांची डोकेदुखी वाढली

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : शहरात दररोज २० ते २५ टन चिकन आणि मटण वेस्ट निघते. मात्र, पुरेशा जनजागृती अभावी, या व्यावसायिकांकडून चिकनचा कचरा कुंडीवर फेकला जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात किरकोळ चिकन सेंटर मालक, मटण शॉप आणि फिश व्यावसायिकांची हजारात संख्या आहे. त्यांच्याकडील दररोजचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १६ वाहनांची सोय केली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयासाठी दोन गाड्या आहेत. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिलेले आहे. मात्र, सध्या त्या ठराविक वाहनांमध्ये रोजच्या रोज टाकण्यात येत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. व्यावसायिकांकडून कोंबडीची पिसे, टाकाऊ साहित्य, माशांचे खवले, चिकनचे तुकडे आणून रात्रीच्या वेळीच टाकण्यात येतात. त्यामुळे भटकी कुत्री फेकलेले तेच चिकनचे तुकडे घेऊन रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांची डोकेदुखी वाढली आहे.
संकलित करण्यासाठी वाहने दिलेली आहेत. पण, नागरिकांच्या बेजबाबदारवृत्तीमुळे कचरा इतरत्र फेकला जातो. अशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. – डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी