कौतुकास्पद !महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्यात पिंपरी-चिंचवड च्या ५ जणांचा समावेश
-कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पिंपरी । लोकवार्ता-
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई येथे आयोजित ३४ व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्यात ५१ जणांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील ५ जणांचा समावेश आहे. कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

२५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारामध्ये किरण चंद्रकांत देशमुख – अल्फा लवाल (इंडिया प्रा. लि. दापोडी), हनुमंत रामचंद्र जाधव – लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, बाळासाहेब लिंबराज साळुंके – टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी, शिवाजी सुबराव पाटील – टाटा मोटर्स लि. पिंपरी, दत्तात्रय पांडुरंग गायकवाड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहन चालक, शेतमजूर, ऊस तोड कामगार आदी असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करताना कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.