कित्तेक वर्षानंतर भोसरीच्या घाटात घुमणार भिर्रर्रर्र चा आवाज
-ग्रामदैवत भैरवनाथ उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन.
भोसरी । लोकवार्ता-
कित्तेक वर्षानंतर भोसरीच्या घाटात घुमणार भिर्रर्रर्र चा आवाज .भोसरीचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज उत्सवानिमित् वर्षानुवर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बैलागाडा घाटाची तयारी जोरात सुरू असून, पंचक्रोशीतील बैलगाडा शौकीन आणि गाडामालकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भोसरी गावचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज जत्रेनिमित्त प्रतिवर्षी उरुस भरतो. गेल्या दोन वर्षांत कोविडच्या परिस्थितीमुळे उत्सव झाला नाही. मात्र, यावर्षी निर्बंध हटवल्यामुळे उत्सव थाटामाटात पार पडला. बैलगाडा शर्यतींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर प्रथमच शर्यती होणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवार, दि. १८ व गुरुवार, दि. १९ मे रोजी भोसरीतील बैलगाडा घाटात या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
गुढी पाढव्याला गावातील ज्येष्ठ मंडळींची बैठक मंदिरात घेण्याची परंपरा आहे. या बैठकीत गावच्या विकासाबाबत किंवा कारभाराबाबत वर्षभराचे नियोजन केले जाते. भैरवनाथ उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ भोसरी (भोजापूर) यांच्या पुढाकाराने उत्सव आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यासह नगरमधील गाडामालकही भोसरीच्या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होतात. यावर्षी प्रशासकीय अडथळ्यांमुळे बैलागाड शर्यत निर्धारित वेळेत बदल करुन पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याबाबत सकारत्मक प्रतिसाद दिला असून, दोन दिवसांत अधिकृत परवानगी मिळणार आहे. त्यादृष्टीने घाटाची तयारी जोरदार सुरू आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अशोक लांडगे यांनी दिली.
विजेत्यांची आकर्षक बक्षिसे
अंतिम फेरीत विजेत्या बैलगाडा मालकांना ६ दुचाकी, चांदीची गदा, ३ एससीडी, २ फ्रिज आणि २ जुपते गाडे देण्यात येणार आहेत. यामध्ये दि. १८ मे रोजी होणाऱ्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास माजी नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या वतीने दुचाकी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास स्व. तुकाराम देवकर यांच्या स्मरणार्थ देवराम देवकर यांच्या वतीने दुचाकी तसेच, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास अमर लांडे आणि स्वप्नील लांडे यांच्या पुढाकाराने दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे. दि. १९ मे रोजी होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास दिगंबर फुगे यांच्या वतीने दुचाकी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास कै. मारुतीनाना कंद यांच्या स्मरणार्थ आकाश कंद आणि गणेश कंद यांच्या वतीने दुचाकी, तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास सागर गवळी व अनिल लांडगे यांच्या पुढाकाराने दुचाकी भेट देण्यात येणार आहे.