आकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग
लोकवार्ता : आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारखाना हा नागरी वस्तीत असल्याने कारखान्याच्या एका बाजूला बीना इंग्लिश स्कूल, दुसऱ्या बाजूला रेलवे लाईन व दळवी नगर असा परिसर आहे. वर्दळीचा भाग असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. तसेच अन्निशमदलाच्या वतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. आगीचे रौद्ररुप पाहता घटनास्थळी एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्या आग विझवण्याचे काम करत आहेत.
आगीचे लोट व धूर दिसताच कारखान्याला लागूनच असलेल्या बीना इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत. शाळेतील सुमारे 450 मुलांना शाळे बाहेर काढण्यास सुरुवात केली. आग लागली तेव्हा शाळेची मधली सुट्टी होती. त्यामुळे मुले मैदानात होती, तर काही मुले वर्गात होती. शिक्षकांनी धावाधव करत सर्व मुलांना शाळेबाहेर काढत त्यांच्या पालकांशी संपर्क साधत शाळेला सुट्टी देत मुलांना घेऊन जाण्याची विनंती केली. यावेळी पालक परिसरात येवून त्यांच्या मुलांना घरी घेऊन जात आहेत.