“मोशी येथे उद्या पासून कृषी प्रदर्शनाला सुरुवात”
-ठरणार भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन.
मोशी | लोकवार्ता-
दरवर्षी मोशी या ठिकाणी सर्वात मोठे कृषी प्रदर्शन पार पडत असते . सर्व नागरिक दरवर्षी या कृषी प्रदर्शनाची वाट पाहत असतात. यावर्षी देखील भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन “किसान” २३ ते २७ मार्च दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे आयोजित केले आहे. संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विविध दालने उभी करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येत असतात. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे.
या वर्षी किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 80 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील.

प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 150 रुपये आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. ही संख्या एक लाखांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. किसान मोबाईल अॅपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे, जेणे करून शेतकरी व प्रदर्शक संस्थांमधील संवाद आधीपासूनच सुरु होईल.
किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वर्षी किसान प्रदर्शन मोशी येथे नवीन बनत असलेल्या अद्ययावत खुल्या प्रदर्शन केंद्रात होत आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020-30252000 / www.kisan.in इथे संपर्क करता येईल.