राष्ट्रवादी अन् माजी आमदार विलास लांडेंच्या अपयशावर अजित गव्हाणेंकडून शिक्कामोर्तब !
– राष्ट्रवादी काँग्रेसला रेडीरेकनर दराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
-भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते रणजित गव्हाणे यांची टीका.
पिंपरी । लोकवार्ता-
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये रेडीरेकनरचे दर कमी झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्ते रणजित गव्हाणे यांनी केली आहे.
राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर नुकतेच जाहीर केले. ज्या भागात सर्वाधिक विकास होतो. त्या भागातील रेडीरेकनरचा दर अधिक असतो, असा संदर्भ देत अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदार संघात आमदार महेश लांडगे विकासकामे करण्यात कमी पडले, असा आरोप केला होता. त्याला सामाजिक कार्यकर्ते रणजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून प्रत्त्युत्तर दिले आहे.
रणजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघ आणि भोसरी मतदार संघ यांची रेडीरेकनर दरांवरुन तुलना करणे म्हणजे भारत आणि अमेरिकामध्ये विकासकामांची तुलना केल्यासारखे आहे. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागात निवासी सदनिकांचा दर सर्वाधिक आहेत. मात्र, भोसरीतील मोशी, तळवडे, चिखलीतील दर कमी असल्याचा दावा अजित गव्हाणे करतात. पण, महापालिकेच्या स्थापनेपासून जो भाग महापालिका हद्दीत आहे. त्याचा विकास अगोदर होणार, हे क्रमप्राप्त आहे. त्यातच पुणे-मुंबई महामार्गालगतचा भाग सर्वाधिक विकसित झाला. भोसरीतील समाविष्ट गावे महापालिका हद्दीत आल्यापासून २० वर्षे विकास झाला नाही. कारण, तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माजी आमदार विलास लांडे यांनी समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष केले.

अजित गव्हाणेंमधील व्यासायिक जागा झाला…
अजित गव्हाणे यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. भोसरीपासून चऱ्होली, चिंबळीपर्यंत मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये गव्हाणेंसह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागिदारी आहे. रेडीरेकनचे दर वाढले की घरांच्या किंमती वाढतात. त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना होतो, हे सर्वमान्य सूत्र आहे. पण, घरांच्या किंमती वाढल्या की सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतो. पिंपरी-चिंचवड शहर हे सर्वसामान्य कामागारांचे, कष्टकऱ्यांचे आहे. इथे राहायला आलेल्या नागरिकांना चांगली घरे माफक किंमतीत मिळावी, अशी धारणा राज्यकर्त्यांची असली पाहिजे. मात्र, गव्हाणे व्यावसायिक दृष्टीकोनातून रेडीरेकनर वाढला पाहिजे, असा दावा करीत आहेत. त्यामुळे पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले, अजित गव्हाणे यांनी दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पीत राजकीय वक्तव्ये करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय अपेक्षीत आहे, याचा विचार करावा, असेही रणजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या काळात समाविष्ट गावांना पाणीसुद्धा मिळाले नाही…
आजच्या घडीला समाविष्ट गावांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा अर्थात शंभूसृष्टी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम, स्केटिंग ग्राउंड, जलतरण तलाव, डिअर सफारी पार्क, संतपीठ, न्यायालयाची प्रस्तावित इमारत, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, अर्बन स्ट्रिट डिझाईन, थोरल्या पादुका शिल्प समुह, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, ठिकठिकाणी उद्यान विकसित होत आहेत. मोठे प्रकल्प आणि जाळे निर्माण झाल्यामुळे मोशी-चिखली-चऱ्होली असा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होत आहे. तसेच, पर्यटनाचे विविध स्पॉट भोसरीत विकसित होत आहेत. त्यामुळे आगामी काळात भोसरी मतदार संघातील रेडीरेकनरचा दर वाढणार आहे. या भागातील जमिनींना सोन्याचे भाव आले. स्थानिक शेतकरी आता व्यावायिक झाले. लोकवस्ती वाढू लागली. मात्र, राष्ट्रवादी आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या काळात समाविष्ट गावांना पाणीसुद्धा मिळाले नाही. मग, रेडीरेकनर कसा वाढेल. त्यामुळे अजित गव्हाणे यांनी अभ्यास करुन बोलावे, असा सल्लाही रणजित गव्हाणे यांनी दिला आहे.