शहर राष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वावर शंका…नक्की काय घडलंय खाली वाचा..!
पाच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा फेकला, आणखी १० ते १५ जन बंडखोरीच्या तयारीत,
अजित पवार यांच्या दौऱ्यानंतरही राष्ट्रवादीची घरघर थांबेना..!
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या नवनिर्वाचित पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची विश्वसनीय सुत्रांकडुन माहिती मिळाली असून, आणखी 10 ते 15 पदाधिकारी ही नाराज असून तेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी समोर आल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचं हे मोठं अपयश मानलं जात असून त्यांच्या नेतृत्वावरही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे, नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात दौरा केला असताना ही राष्ट्रवादीतील अंतर्गत घरघर काही थांबायचं नाव घेत नाही अशी परिस्थिती दिसून येते त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सध्या खळबळीचे वातावरण आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या पदावर इम्रान शेख यांना शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यावेळीच आधीच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये शेख यांच्या नियुक्तीवरून नाराजी असल्याची चर्चा होती, कारण विशाल वाकडकर यांनी शहरातील सर्वात मजबूत अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी निर्माण केली, त्यातूनच अनेक युवा कार्यकर्ते त्यांनी घडविले, ज्यामधून येत्या महापालिका निवडणुकीत अनेकजण उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित इम्रान शेख अकार्यक्षम ठरले असल्याचेही राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात असल्याने नाराज वर्ग आणखी वाढत गेला आणि जाणीवपूर्वक कार्यक्षम कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले अशी चर्चा आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष शुभम पंडित, राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर उपाध्यक्ष वेदांत माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सचिव प्रशांत काळेल यासह अजून दोन अशा पाच पदाधिकाऱ्यांनी इम्रान खान यांच्याकडे राजीनामे दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का..
राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येण्याने हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का ठरू शकतो, अंतर्गत धुसफूस, पदांवरून नाराजी, राजीनामे ह्या गोष्टी राष्ट्रवादीसाठी धोकादायक तर भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतील. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षांतर्गत नाराजी व धुसफूस थांबविण्यासाठी काय शक्कल लढवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यासंदर्भात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही..

