अमित शहा पुणे दौऱ्यावर, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार
पुणे | लोकवार्ता-
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीतच भाजपकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय 26 नोव्हेंबर च्या अमित शहा यांच्या दौऱ्यात गणेश कला क्रिडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. अमित शहा यांचा या दौरा संदर्भात महापौर बंगल्यावर मंगळवारी एक बैठक पार पडली.

दरम्यान आगामी पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील नगरसेवक पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना विषय मोडवर गती देण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याचे आवाहन केले. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी याआधीच व्यक्त केला आहे.