अमोल कोल्हे परतले : एकांतवासाच्या कारणाचा उलगडा…
अमोल कोल्हे यांनी ७ नोव्हेंबरला फेसबूकच्या माध्यमातून एकांतवासात जाण्याची दिली माहिती
पिंपरी| लोकवार्ता-
शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर आपल्या एकांतवासाचा उलगडा केला आहे. यामागे कोणताही राजकीय हेतु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी सोशल मिडीयामधून त्यांनी याबाबत आपल्या मतदार, चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानसिक थकवा स्वीकारणे ही काळाची गरज आहे, मात्र या एकांतवासाला नकारात्मक दृष्टीने पाहिले गेले. काहींनी माझ्याप्रती सहानुभूती दर्शवली तर काहींनी मला सहमती दाखवली. दुसऱ्या बाजूला काहींनी राजकीय संन्यासाची आणि पक्षांतरापर्यंत मजल मारली याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
‘अमोल ते अनमोल’ या एका नवीन युट्यूब चॅनेलची केली घोषणा.
अमोल ते अनमोल’ या चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत डॉ. कोल्हे म्हणाले, या एकांतवासामध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. काही गोष्टींची नव्याने जाणीव झाली. चाहत्यांच्या प्रतिक्रियांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून मानसिक जाणीवेची गरज निर्माण झाली. तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला येणारा मानसिक थकवा ही मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. याचे मुख्य कारण तिशीतल्या तरुणाचे हदयविकाराने निधन, ऐन पस्तीशीत मधुमेहाची सुरुवात अशा अनेक दुर्देवी बातम्या कानावर आदळत असतात. अनेक आजारांचे कारण मानसिक तणाव हे आहे. केवळ लोकप्रतिनिधी आणि कलाकार म्हणून नाहीतर एक डॉक्टर म्हणून मी सांगत आहे.

स्वप्न, महत्वाकांक्षा आणि गरज यांच्यामुळे अनेक सीमारेषा पुसट होऊ लागल्या आहेत. आता प्रत्येकजण धावू लागला आहे. धावताना माणूस एक गोष्ट विसरला ती म्हणजे तो नेमका का धावतो आहे. केवळ तो धावताना थांबला तर लोकं आपल्याला काय म्हणतील या भीतीपोटी तो धावतोय का? याचे उत्तर आपण शोधायला हवे. मात्र या दरम्यान आपल्या मनाचे काय? हे सगळ्यात महत्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या तरुणाईला हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. आपले मन आपण कुठे मोकळे करायचे, हा प्रश्न आहे.
तसेच मानसिक थकवा स्विकारण्यापासून तो दूर करण्याच्या प्रक्रियेमधील संभवणारा एक मृत्यु जरी वाचला तरी या सगळ्याचे चीज होईल ही माझी प्रामाणिक भावना आहे. मी एकांतवासातून काय विचार केला हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल. माझ्या मित्रांनी मावळत्या सूर्याचा असा उल्लेख केला. प्रत्यक्षात तो उगवतीचा सूर्य असा आहे. आपली वैचारिक बैठक पक्की व्हावी यासाठीचा हा एकांतवास आहे. आता मी पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून तुम्हा सर्वांसमोर येणार आहे. त्यासाठी मी सज्ज आहे.