संत तुकाराम महाराज मंदिराच्या मुख्य कमानीवर सापडला पूर्वकालीन शिलालेख
शिलालेखावर श्री क्षेत्र देहू येथे श्री रुक्मीणी पाडुरंगदेव व तुकाराम महाराज यांचे देवालय आहे.
देहू । लोकवार्ता
जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या उत्तर दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराच्या मुख्य कमानीवर नगारखान्याखाली दुर्मीळ शिलालेख सापडला आहे. तो खोदीव स्वरूपाचा असून सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत आहे. काळाच्या ओघात अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत. शिलालेखावर श्री क्षेत्र देहू येथे श्री रुक्मीणी पाडुरंगदेव व तुकाराम महाराज यांचे देवालय आहे. त्या सभोवताली असलेल्या प्राचीन जीर्ण ओवऱ्या व त्याचा जीर्णोद्धार होण्याविषयीचा उल्लेख आहे.

शिलालेखाचा अर्थ असा आहे, शालिवाहन शकाच्या पिंगळ नाम संवत्सरात १७७९ व्या वर्षीपासून ते शके १७८८ व्या वर्षापर्यंत क्षेया संवत्सरात म्हणजेच इसवी सन १८५७ ते १८६६ या काळात मौजे देहू येथे विठ्ठल रुक्मिणीचे व तुकाराम महाराज यांचे देवालय आहे. त्या देवालयाभोवती ज्या ओवऱ्या आहेत. त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी देहू संस्थानचे मुख्य श्रीमंत महाराज, सदानंद बाबा गोसावी यांनी सर्वांना एकत्र आणून त्यांच्या आज्ञेवरून महाराज राजश्री नारायण सदानंद बाबा यांना मुख्य करून कल्याणचे शिवजी शेठ व त्यांचे सर्व कुटुंब नैनाबाई पुरुषोत्तम शेठ की, जे मुंबई येथे राहणारे आहेत. त्यांना हे काम सांगितले आहे. यावरून या दोन्ही शेठ लोकांनी आपल्याकडील मिस्त्री (कारागीर) व लोणावळा रेल्वेच्या घाट कामासाठी गाड्या पुरवणारे लोक (कामगार) व मौजे किन्हई येथील राजश्री हनुमंतराव बीन राघुजी पाटील (पिंजण), तसेच त्यांची मुले व भाऊबंद आणि भोवरगावचे गाडीवाले लोक यांच्या मदतीने गाडीवाले लोकांवर धर्मादाय बसवून म्हणजेच ट्रस्ट स्थापन करून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून मंदिराच्या ओवऱ्याचा जिन्यापासून उत्तर बाजूच्या श्री गजाननाच्या ओवऱ्यापर्यंत एकूण ४६ ओवऱ्या पूर्व बाजूची दोन जोती तसेच उत्तर दरवाजाच्यावर नगारखाना अशी सर्व कामे व जीर्णोद्धार सुटेवाडी गावचे सिधोजी बीन विठोजी माळी व त्यांचे हाताखाली असलेले कामगारांकडून १८५७ ते १८६६ या ९ वर्षाच्या काळात, पूर्णत्वास गेले आहे. याचबरोबर अशीच प्रमाणबद्ध कामे व्हावीत अशी अजून इच्छा असून ती पूर्ण करण्यास ते समर्थ आहेत.