कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करण्याचं आवाहन – अजित पवार
म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या,

लोकवार्ता । प्रतिनिधी
कोरोनामुळे लाॅकडाऊन पडल्यानं अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आता रुग्णसंख्येत घट होत असल्यानं अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आलेत. अशातच बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे.

म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्याबाबतचे निर्णय प्रशासनानं घ्यावेत, असे निर्देशही यावेळी अजित पवार यांनी दिले.दरम्यान, पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, असं आवाहन अजित पवार यांनी सांगितलं.
बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.