शाळाबाह्य मुलांचं देशप्रेम दर्शविणारा “निशाण” लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
“निशाण” लघुपटात नेहरूनगर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांने साकारली मुख्य भूमिका!
लोकवार्ता : रेडबड मोशन पिक्चर्स निर्मित दारिद्र्याच्या छायेखाली राहणाऱ्या शाळाबाह्य चिमुकल्यांचं देशप्रेम दर्शविणारा “निशाण” हा लघुपट भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या सामाजिक आशय असलेल्या लघुपटाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. “गोल्डन डिर” या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “बेस्ट चिल्ड्रन्स शॉर्ट फिल्म” व “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” अश्या दोन्हीं विभागामध्ये संपूर्ण भारतातून पिंपरी चिंचवड मधील लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

“निशाण” हा डोळ्यांत अंजन घालणाऱ्या लघुपटातील सर्व कलाकार पिंपरीतील नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन परिसरातील आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्व कलाकार प्रथमच अभिनय करत आहेत. या लघुपटात मुख्य भूमिका साकारणारा गौरव कदम हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील माध्यमिक विद्यालयात चौथी इयत्तेत शिकत आहे. त्याच्या अभिनयाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
एक चायवाला ते कोण बनेगा करोडपती (video)
झोपडपट्टीत राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांची देशभक्ती कशी असते, शिक्षण घेण्याची अतुट इच्छाशक्ती असताना आर्थिक दारिद्र्यामुळे झोपडपट्टीतील मुले या मुख्य प्रवाहातून कशी दूरवर फेकली जातात. शाळेच्या अवतीभवती भटकत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची माहिती कानावर पडते, अन् ही मोहीम कश्या पद्धतीने यशस्वी केली जाते हे ‘निशाण’ या लघुपटात दाखवण्यात आले आहे.

या लघुपटाचे लेखन, व दिग्दर्शन सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. याचे संपादन पिंपरीतील एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. निर्माते मनोज गायकवाड, राजेंद्र कालिया हे आहेत.बाल कलाकाराची मुख्य भूमिका गौरव कदम या चिमुकल्याने केली आहे. तर सह बाल कलाकारची भूमिका वेदांत डोंगरे, कुमार आवचर, प्रज्वल तुमकुर, प्रदीप तुमकुर यांनी काम केले आहे. अंकुर शहा, बसवराज तुमकुर यांनी मोठ्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. छायाचित्रण प्रशांत कोचरेकर, संगीतबद्ध प्रथमेश कानडे. या लघुपटासाठी शिवा हरळ, सुनील वाघमारे, अर्चना गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘या’ वृक्षाखाली घेतली समाधी (video)
“निशाण” या लघुपटाचे दिग्दर्शक लेखक सीए अरविंद भोसले म्हणाले, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही नेहमीच सामाजिक संदेश देणारे लघुपट बनवीत असतो. “निशाण” या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. यापूर्वी देखील आम्ही बनवलेल्या महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या “भावना” या लघुपटाला सलग ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.