भाजपला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शहरात कृत्रिम पाणीटंचाई; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा आरोप
पिंपरी | लोकवार्ता-
प्रशासकाने पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेऊन आठ दिवस उलटत नाहीत तोच संपूर्ण शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आयुक्त राजेश पाटील यांच्यावर दबाव टाकून पाण्यावरून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.
प्रशासक म्हणजे आयुक्त राजेश पाटील यांच्या हातात संपूर्ण महापालिकेचा कारभार गेला आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपून अवघे 8 दिवस झाले आहेत. तसेच, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच धार्जिन ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांनी शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात पाण्याची बोंब सुरू आहे. तसेच, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर, महात्मा फुले नगर आदी भागांत पाणी टंचाई निर्माण झाली आहे, असे एकनाथ पवार यांनी आयुक्तांना सांगितले.

दरम्यान, आयुक्त राजेश पाटील यांनी आज पूर्णानगर व संभाजीनगर भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत पाण्याबाबत एकनाथ पवार यांनी चर्चा केली. पूर्ण दाबाने आणि पुरेसा वेळ पाणीपुरवठा करावा. संबधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली.