पुणे जिल्हा प्रशासन वारीच्या स्वागतासाठी सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात
लोकवार्ता : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा वारी सोहळा विठुरायाच्या नामघोषात साजरा होणार आहे. राज्य आणि जिल्ह्या प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीची तयारी सुरु झाली.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वारीची तयारी सुरु आहे. वारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या १५ तारखेला पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे, मूलभूत सोई-सुविधा या सर्व गोष्टींची तयारी पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. श्री क्षेत्र देही आणि आळंदी येथून पालखी प्रस्थान होणार असल्याने जिल्ह्यातील मुक्कामाच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.
यामध्ये भोर येथील मोऱ्यांची, बारामती येथील उंडवडी, सुपे येथील सर्व्हिस रोडची दुरुस्ती तसेच दौड ते निरा रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कऱ्हा नदीवरील पुलाच्या दुरीस्तीचे आणि इंदापूर तालुक्यातील आंथुर्णे येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात येणार आहे.
महिलांसाठी आरोग्याची खास सुविधा करण्यात आली आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी, ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक, १८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहेत. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यासाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे.