संकष्ट चतुर्थीनिमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपतीला द्राक्ष्यांची आकर्षक आरास
-तब्बल दोन हजार किलो द्राक्षांनी सजले मंदिर.
पुणे । लोकवार्ता-
प्रत्येक चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे बाप्पांना काही ना काही मनमोहक आरास करून विराजमान करण्यात येते. मात्र या संकष्ट चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आज (दि. 21 मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यातआला आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जात आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळी ही आरास पूर्ण झाली असून भाविकांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. भाविकांनीही मंदिरात गर्दी केली आहे. दिवसभर भाविकांची मांदियाळी मंदिरात असणार आहे.

सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे. ही द्राक्षे न धुता ही खाता येणारी असून पूर्णत नैसर्गिक, रसायनविरहित आहेत. ती नंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना, गरजूंना तसेच भाविकांना वाटली जाणार आहेत.