लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर…-संजय राऊत

‘फाळणीचा दिवस विसरु नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी

‘फाळणीचा दिवस विसरु नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

  • काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये –
  • हिंदुस्थानची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरू स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या.
  • इतक्यात बाजूच्या खोलीतला पह्न वाजला. नेहरू आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी पह्न ठेवला व काळवंडलेल्या चेहऱयाने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, ‘‘काय झाले? कुणाचा फोन होता?’’
  • ‘‘लाहोरचा फोन होता.’’ नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, ‘‘लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱया सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?’’
  • फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वतःच मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून.
  • सीमावर्ती भागातील रेल्वे स्टेशनांवर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. ‘हिंदू पाणी, हिंदू चहा’ आणि ‘मुसलमान पाणी, मुसलमान चहा’ वेगवेगळय़ा स्टॉल्सवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेय, ‘फाळणी विसरू नका.

नवा कार्यक्रम
पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व 14 ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतोय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती? प्रा. नरहर कुरंदकर यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘अखंड भारतवाल्यांनी लढाच दिला नाही. अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला त्याचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? अखंड हिंदुराष्ट्रवाल्यांनी नेमके हेच कार्य केले. अखंड हिंदुस्थानचा जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद म्हणजेच ‘फाळणी’ मान्य केली आणि अखंड हिंदुस्थान टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला. पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाटय़ा पिटणाऱयांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता. म्हणजेच एरव्ही जे लढताना मेले आणि जे अंथरुणावर झोपी गेले त्या दोघांनाही सारखेच वंदनीय ठरविण्यात अर्थ नसतो!’’

घाव कायम आहे
फाळणी हा जनतेच्या हृदयातील घावच होता. तो घाव आजही भरलेला नाही. पण स्वातंत्र्यानंतर फाळणीस फक्त गांधी-नेहरू-काँग्रेसलाच जबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली. कारण देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात वीर सावरकर, श्यामा प्रसाद मुखर्जी, लोहियांसारखे मोजके नेते सोडले तर फक्त काँग्रेस आणि त्यांचे नेतेच होते. हिंदू आणि मुसलमान एकत्र नांदू शकणार नाहीत हा विचार पेरणारे नेतेदेखील होते, पण त्यासाठी जे लढणारे होते त्यांच्या मागे जनतेचे फारसे पाठबळ नव्हते. त्यांची शक्तीच अपुरी होती. गांधींचे नेतृत्व हे हिंदू समाजाचे नेतृत्व होते. फाळणीच्या वेळीही या देशात 85 टक्के लोक हिंदू होते. हिंदू तेव्हा गांधींना आपला नेता मानत होते. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्यच ज्यांनी मान्य केले नाही अशा मोजक्या प्रखर हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आपल्या घरांवर पिंवा कार्यालयांवर तिरंगा फडकवला नाही पिंवा ते स्वातंत्र्य सोहळय़ात सहभागी झाले नाहीत. फाळणी ही वेदना आहे व राहणार. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात हिंदू आणि मुसलमान खांद्याला खांदा लावून लढत होते. बॅ. जीना स्वतः या चळवळीत आघाडीवर होते. ‘‘मी शंभर टक्के हिंदी माणूस आहे,’’ असे सार्वजनिक व्यासपीठावरून गर्जना करणारे जीना नंतर फक्त मुसलमानांचे नेते बनले. ‘मी तुमच्या देशाचा, तुमच्या राष्ट्राचा आणि तुमच्या संस्कृतीचा माणूस नाही,’ असे जीना उघडपणे बोलू लागले. जीना हे स्वतःला मुसलमानांचे नेते मानू लागले. कारण गांधी हे मुसलमानांचे फाजील लाड पुरविण्याच्या मनःस्थितीत नव्हते. गांधी काँग्रेसचे नेतृत्व करीत असतानाच एक एक मुस्लिम गट काँग्रेसमधून फुटून बाहेर गेला. जीना गेले, नंतर मौलाना शौकत अली, नंतर महंमद अली, नंतर चौधरी खली खुज्जमान गेले. सगळय़ात शेवटी कय्युम खान गेले. मुसलमानांना अधिक काही देणार नाही हे तेव्हा गांधींचे धोरण होते. सत्य असे आहे की, मुसलमानांसाठी वेगळे किंवा विभक्त मतदारसंघ ही मागणी मान्य झाल्यामुळेच मुस्लिम लीग बळकट झाली. तेव्हा गांधी देशाच्या राजकारणात सक्रिय नव्हते. लोकमान्य टिळकांनी 1916 साली लखनौ करार केला. टिळकांच्या या कराराने नवा सिंध प्रांत निर्माण झाला. टिळकांनीही मुसलमानांसाठी वेगळा मतदारसंघ मान्य केला. मुसलमानांना मध्यवर्ती कायदे मंडळात लोकसंख्येनुसार आवश्यक प्रतिनिधित्व म्हणजे राखीव जागा मान्य केल्या. अर्थात टिळक काय पिंवा काँग्रेसचे इतर नेते काय, त्यांची भावना ऐक्याची होती व स्वातंत्र्य चळवळीत धार्मिक तेढ नको हीच होती. पण आपण स्वतंत्र वेगळे राष्ट्र आहोत ही भावना नंतर मुसलमानांत वाढू लागली व शेवटी प्रकरण देशाचे विभाजन होण्यापर्यंत गेले. इथे एक गोष्ट सध्याच्या राजकीय हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेतली पाहिजे. देश स्वतंत्र होताच पं. नेहरूंनी मुसलमानांचा राखीव मतदारसंघ रद्द करून टाकला. मुसलमानांसाठी दिलेल्या सोयी-सवलती रद्द करून टाकल्या.

जीनांना का सोडले?
ब्रिटिशांनी जीनांना पाकिस्तान मिळवून दिले. जीनांनी पाकिस्तान मिळविला नाही. वकिली डावपेच लढवून, हिंदूंना शिवीगाळ करून त्यांनी पाकिस्तान मिळविला. पाकिस्तानची निर्मिती होत असताना जीना यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या राक्षसी कत्तली ते थांबवू शकले नाहीत. लक्षावधी हिंदू आणि मुसलमान प्रजा निर्वासित होऊन देशोधडीस लागली. माणसांचे विभाजन झाले. जमिनीचे तुकडे पडले. लष्कर, संपत्ती, पैसे म्हणजे गंगाजळीची वाटणी झाली. पुन्हा इतके होऊनही दोन्ही देशांत एकमेकांमध्ये कधीच शांतता नांदू शकली नाही. फाळणी ही आपत्तीच होती व आज ना उद्या देश अखंड होईल या आशावादावर मोठा वर्ग आजही जगात आहे. काही लोक गांधीहत्या करणाऱया पंडित गोडसेंच्या प्रतिमेची आजही पूजा करतात. त्यांच्या फाशी दिवसाचा सोहळा साजरा करतात. गोडसेंना श्रद्धांजली म्हणून गांधीच्या प्रतिमेवर गोळय़ा झाडून पुनःपुन्हा गांधीहत्येचा आनंद साजरा करतात. फाळणी नको असे सांगणारे, लिहिणारे मूठभर लोक तेव्हाही अगदी याच पद्धतीने वागत व जगत होते. त्या काळात एखाद्या फाळणीविरोधी गोडसेने पाकिस्तानचा रेटा लावणाऱया जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ 75 वर्षांनंतर आली नसती. गोडसेने निःशस्त्र गांधींना मारले. कारण त्यांच्या दृष्टीने फक्त तेच एकमेव फाळणीचे गुन्हेगार होते. मग जीना कोण होते? बॅ. जीनांनी फक्त एक टाईपरायटर,वकिली कौशल्यावर देशाची फाळणी घडवून पाकिस्तान मिळविला. गोडसेसारख्यांनी जीनांना संपवले असते तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते.

आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? त्यावर उपाय एकच. फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम, अंतःकरणाच्या खोल कप्प्यात सदैव ठसठसत आहे. हिंदुस्थान पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावे!

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani