बालाजी तांबे यांचे कोरोना संसर्गामुळे निधन
कोरोनाचा संसर्ग नव्हता असा कुटुंबीयांकडून दावा

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन कोरोना संसर्गाने झाले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. १० ऑगस्टला त्यांचे निधन झाले. मात्र, तांबे यांना कोरोनाचा संसर्ग नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या संसर्गाने खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास संबंधिताच्या अंत्यविधीसाठी रुग्णालयाकडून ऑनलाइन पद्धतीने थेट स्मशानभूमीकडे मृत्यू दाखला देण्यात येतो. इतर कारणांनी दगावलेल्या रुग्णाबाबत खासगी रुग्णालये असा दाखला देत नाहीत. बालाजी तांबे यांच्या प्रकरणात त्यांचे निधन झालेल्या खासगी रुग्णालयातूनच ऑनलाइन पद्धतीने मृत्यू दाखला स्मशानभूमीकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
योग, आयुर्वेद आणि संगीत हे अनेक दुर्धर आजारांवर प्रभावी उपाय ठरूशकते, या त्रिसूत्रीवर आधारित काम गेली अनेक वर्षे बालाजी तांबे करीत होते. लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून या त्रिसूत्रीबाबत ते जनजागृती करत होते. राजकारण, अभिनय, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून काल्र्यात येत होते.
बालाजी तांबे याचे चिरंजीव डॉ. सुनील तांबे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले ‘पंधरा दिवसांपूर्वी बाबांना (बालाजी तांबे) ताप आला होता. तेव्हा आरटीपीसीआर तपासणी केली असता अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर त्यांना थोडासा त्रास जाणवल्याने रुग्णालयात सर्व तपासण्या करण्यात आल्या. सर्वाचा अहवालही सर्वसाधारण होता. त्यानंतर रुग्णालयात अचानक त्यांचे निधन झाले. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांची वारंवार तपासणी होते. परंतु, काही दिवसांपूर्वी येथे दहा-बारा कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला. मात्र, प्राथमिक स्तरांच्या उपचारांतच ते बरे झाले. बाबांच्या वयाचा विचार करता खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्या तपासण्या नकारात्मक होत्या.’