देहू मध्ये मांस विक्रीवर बंदी;अन्यथा होणार कडक कारवाई !
-देहू नगरपंचायतीचा कडक निर्णय;निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यास होणार कडक कारवाई.
देहू । लोकवार्ता-
श्री क्षेत्र देहू संतांची भूमी म्हणून प्रचलित आहे. बंदी असताना देखील देहू क्षेत्रात मांस विक्री सुरूच होती . परंतु आता याला कडक बंदी घालण्यात आली आहे. श्री क्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून देहू नगरीमध्ये ही अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलीस कारवाई होणार आहे. देहू हे तीर्थक्षेत्र असून, लाखो वारकरी देहूत दाखल होऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात.

वारकरी परंपरा आणि तीर्थक्षेत्र असल्याने देहूत अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी देहू ग्रामपंचायत असतानाही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्व साधारण सभेत हा निर्णय घेतला. त्यामुळे आता देहूनगरी शुद्ध शाकाहारी बनली आहे. देहू नगरीतील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.देहू नगर पंचायत मध्ये आज याचा निर्णय झाला. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. संत तुकाराम महाराज देहू संस्थांनकडूनदेखील याचे स्वागत करण्यात आले आहे.