वायसीएम रुग्णसेवकांचे आंदोलन मागे; आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी
आमदार महेश लांडगे यांचे परिचारिकांना आश्वासन…

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : महापालिका आणि शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय मधील परिचरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आमदार महेश लांडगे सरसावले आहेत.
“कायम करा कायम करा, मानधन नर्स स्टाफला कायम करा” अशा घोषणा देत वायसीएम रुग्णालयाबाहेर सुमारे १०० ते १५० परिचारिकानी मंगळवारी रुग्णालयाबाहेर आदोलन केले. यावर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी तत्काळ वायसीएमकडे धाव घेतली.
पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे मध्यंतरी कोरोना रुग्णांवरच उपचार केले जात होते. पुणे अथवा पिंपरी मधील गंभीर रुग्ण याठिकाणी दाखल होते. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स स्वत:च्या जीवाची परवा न करता रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोना काळात या परिचारिकाना कायमस्वरूपी करून घेणार आणि वेतनवाढ देणार असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते.

मात्र त्यांच्या आश्वासनांची पूर्तता तर दूरच मानधनातही कपात करण्यात केली आहे, असा आक्षेप आंदोलनकर्त्या परिचारिकांनी घेतला आहे. रुग्णालयात गेल्या १२ वर्षांपासून या कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ठराव केला होता. मात्र अद्याप त्यांना मानधनावर ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात रात्रदिवस सेवा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे गाऱ्हाणे परिचारिकांनी आमदार लांडगे यांच्यासमोर मांडले.
आमदार महेश लांडगे यांचे परिचारिकांना आश्वासन …
महापालिका आस्थापनेवर कायस्वरूपी घेणेबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच, राज्यशासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येईल. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, २५ हजार रुपये मानधनमध्ये २ हजार रुपये कमी केले होते. मात्र, मानधनात २ हजाराची वाढ ( ESIC आणि PF साठी ) करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
परिचारिकांना महिन्याच्या सुट्या देणे, प्रत्येक ३ महिन्याला १० हजार रुपये भत्ता चालू होता तो त्वरित मिळावा. यासाठी निश्चितपणे यशस्वी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी परिचारिकांना दिले. त्यांनतर परिचारिकांनी संप मागे घेतला आणि रुग्णालयाचे कामकाज सुरळीत झाले.
परिचारिकांचे प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका सुजाता पालांडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.