रायरेश्वर किल्ल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने झाला विद्यार्थ्यांचा मृत्यू
लोकवार्ता : बारामतीमधील एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुभम चोपडे असं या विद्यार्थ्यांचं नाव असून बारामतीमधील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात ४६ विद्यार्थी आणि ४ शिक्षकांबरोबर तो रायरेश्वरला ट्रेकिंगसाठी जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

शुभम प्रदीप चोपडे हा विद्यार्थी बारामतीहून पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 4 शिक्षक बरोबर होते. सकाळी 9 वाजता ते भोर-रायरेश्वर मार्गावरील कोर्ले याठिकाणच्या एका हॉटेलवर नाष्टा करण्यासाठी थांबले होते.
नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, आणि त्यातच त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.