एटीएमची चोरी करणाऱ्या हरियाणा टोळीतील ३ आरोपी भोसरी पोलिसांच्या ताब्यात
एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कापून त्यामधून रोख २२ लाख ९५ हजार रुपये चोरीला गेले होते

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : १० जून २०२१ रोजी पुणे नाशिक रोड वरील भोसरी येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कापून त्यामधून रोख २२ लाख ९५ हजार रुपये चोरीला गेले होते. त्यावरून भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला यासंदर्भात तातडीने गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

त्यावरून घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करत भोसरी पोलिसांच्या पथकाने तपास चालू केला. चोरीच्या पद्धतीवरून अशा प्रकारचे चोया हरियाणामधील मेवाड प्रांतातील चोर करतात. अशी माहिती मिळाल्याने हरयाणा व राजस्थान भागातील लोक अथवा त्यांची वाहने अशा घटनेच्या वेळी आले होते का? याची माहिती घेऊन भोसरी पोलिसांनी शोध सुरू केला.
यामध्ये गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना एका संशयित ट्रकसंदर्भात माहिती मिळाली आणि त्याचा शोध घेत असताना (क्रमांक आर जे ०९ जीबी ८०९३) हा ट्रक याच दिवशी घटनेच्या ठिकाणी आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून या ट्रकचा शोध भोसरी पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. हा ट्रक १२ जून २०२१ रोजी पुणे नाशिक हायवेने भोसरीकडे जात असताना दिसला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याला थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

परंतु तो भरधाव वेगात चाकणकडे ट्रक चालक घेऊन निघाला. तेव्हा भोसरी पोलिसांनी पाठलाग करून मोशी टोल नाक्यावर त्याला थांबवले व चालकाला ताब्यात घेऊन चालकासह ट्रक भोसरी पोलीस ठाण्यात आणून लावला. त्यातील चालक दिनमोहम्मद खान (वय २३ वर्षे धंदा चालक राहणार मशिदीजवळ पोस्ट राहुरी, तहसील फिरोजपुर झिर्का, जिल्हा मेवाड, राज्य हरियाणा) त्याच्याकडे कसून तपास केला. त्यावरून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरलेल्या रोख रकमेपैकी त्याच्या वाटेला आलेले तीन लाख ७४ हजार पाचशे रुपये आणि एक मेडिकल वापराचा ऑक्सीजन सिलेंडर त्याने काढून दिला.
या तपासादरम्यान त्याने त्याच्या साथीदारांची माहिती दिली. त्याचे साथीदारही हरियाणा राज्यातील मेवाड प्रांतात असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून भोसरी पोलिस पथक हरियाणा येथे गेले व त्यांनी दोन इसमांना ताब्यात घेतले. शौकीन अख्तर खान (वय २४ वर्षे राहणार पोस्ट रावली तहसील फिरोजपुर झिर्का जिल्हा राज्य हरियाणा) व हर्षद मोहम्मद खान ऊर्फ सोहेल अख्तर (वय ४० वर्ष राहणार रहाडी, तालुका, जिल्हा, राज्य हरियाणा) अशा दोघांना ताब्यात घेतले यांच्याकडे तपास केला असता त्यांनी देखील दाखल गुन्ह्यांची कबुली देऊन त्यांच्या वाट्याला आलेली रोख रक्कम दोन लाख ५० हजार रुपये व एटीएम मशीन मधील पैसे ठेवायची ट्रीप त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी या गुन्ह्यात तीन जणांना अटक केली असून अजून तीन जण फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी ६ लाख २४ हजार ५०० रुपये, गुन्हा करताना वापरल्या ट्रक, गॅस कटर, घरगुती वापराची एक गॅस सिलेंडर टाकी तसेच दोन मेडिकल वापराचे ऑक्सीजन सिलेंडर ,एटीएम मशीन चे पैसे ठेवण्याचे तीन ट्रे, दोन ते तीन मोबाईल फोन असा एकूण २६ लाख ३३ हजार ३६० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक इंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवी भवारी, अंमलदार राकेश भरणे, अजय दगडे, गणेश हिंगे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, समीर रासकर, संतोष महाडिक, सागर जाधव, आशिष गोपी, गणेश सावंत, सुमित देवकर विनोद वीर, राजू जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.