लोणावळ्यातील भुशी धरण झालं ओव्हरफ्लो | bhushi dam
लोकवार्ता : पावसाळा सुरू झाल्यापासून पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांना पाणी कपातीलादेखील सामोरे जावे लागले. मात्र, आता पुणेकरांची ही चिंता मिटली.
हवामान विभागाने येत्या ६ ते ८ जुलै दरम्यान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला. काल लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल हवामान खात्याकडून लोणावळ्यात १६६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. पुणे आयएमडी हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाटात ६ जुलै ते ८ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. तर, ७ जुलैपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चालू पंधरवाड्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील सर्व उपविभागांची तूट भरून काढण्याची आणि सामान्य मान्सूनच्या पावसाच्या श्रेणीपर्यंतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असं देखील कश्यपी म्हणाले आहेत.
७ ते९जुलै दरम्यान पुणे शहरातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अनुपम कश्यपी यांनी वर्तविली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश भागात या मोसमात पडणारा हा पहिलाच मोठा पाऊस असू शकतो असे देखील कश्यपी यावेळी म्हणाले आहेत. महाराष्ट्रात आता मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि घाटांवरही जुलैमध्ये सामान्य पाऊस पडू शकतो अशी माहिती अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.