महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनानिमित्त बांधकाम साहित्य भेट

लोकवार्ता।प्रतिनिधी
तळागाळातील सर्वांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाजाच्या जडणघडणमध्ये मोठे योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम भागातील श्री. पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने बांधकाम साहित्य भेट देण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शाळेला बांधकाम साहित्याची भेट देण्यात आली.
यावेळी श्री. पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र श्री हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, सरपंच नंदाताई कोळप, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, सचिव आंबेकर गुरुजी आदी उपस्थित होते.