भाजपाची आरपार लढाईची तयारी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
लोकवार्ता : चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरुन जगताप कुटुंबियांमध्ये दोन गट असल्याच्या अफवा गेल्या आठवडाभरामध्ये शहराच्या राजकारणात हेतुपुरस्सर पसरवण्यात आली. मात्र, जगताप कुटुंबियांमध्ये दुमत असण्याचे कारण नाही. निवडणूक पूर्वतयारी बैठकीला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी उपस्थिती लावली.

विशेष म्हणजे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेवून ‘‘जगताप कुटुंबात दोन गट’’ या अफवेच्या फुग्यातील हवा अलगद काढून घेतली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक झाली, तर कशी ते लढावी याविषयी चर्चा झाली. उमेदवारी कोण असावा हे आम्ही ठरवत नाही. कोअर कमिटी ठरवते. जगताप कुटुंबात दुमत असणे काही कारण नाही. बिनविरोध होण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. आम्ही त्यासाठी कामाला लागणार आहोत. सर्वांना निवेदन देणार आहोत. कसबा आणि चिंचवड विधानसभा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा संपर्क प्रमुख मुरलीधर मोहोळ, रिपाइंच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे उपस्थित होत्या.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. ते पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दि. २७ फेब्रुवारी ऐवजी दि. २६ फेब्रुवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपाने गाफील न राहता तयारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शक्ती केंद्र आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. त्याची जबाबदार संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याकडे आहे.
उमेदवार जगताप कुटुंबातीलच…
निवडणूक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदार संघाची असून, याठिकाणी जगताप कुटुंबियांमधूनच उमेदवार दिला जाईल, यात शंका नाही. मात्र, त्याबाबत भाजपाच्या पक्षशिस्तीप्रमाणे प्रदेश कोअर कमिटी निर्णय घेत असते. आम्ही संभाव्य उमेदवारांची नावे कोअर कमिटीकडे पाठवली आहेत, असेही पाटील म्हणाले.
महेश लांडगेंच्या नेतृत्वाचा कस…
भाजपाने पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी आढावा बैठक घेतली. यामध्ये महत्वाच्या समितीप्रमुखांची जबादारी निश्चित करण्यात आली. कोपरासभा पासून निवडणूक प्रचार यंत्रणेचे नियोजन करण्याची जबाबदारी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडे आहे. मतदार संघात राज्य आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या सभा, त्याचे नियोजन काटे करणार आहेत. तसेच, सर्वपक्षीय प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्या-त्या पक्षांच्या नेत्यांना सदर निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आवाहन करणे आणि अन्य पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय करुन भाजपासोबत घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची मोठी जबाबदारी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत लांडगे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.