लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सध्या देशामध्ये सर्वात जास्त अराजक स्थिती

आरएसएसने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीस विरोध केला-प्रा.हरी नरके
आरक्षण हे सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक आहे -उत्तम कांबळे

पिंपरी | लोकवार्ता-

या जगात माणूस हाच सर्वश्रेष्ठ आहे. स्त्री, पुरुष समान आहे. धर्म, राष्ट्र माणसासाठी आहे. माणूस धर्म राष्ट्रासाठी नाही तर धर्म आणि राष्ट्र माणसासाठी आहे. ज्या राष्ट्रात माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळत नाही त्या माणसाने बंड केले तरी चालेल. थॉमस पेन यांना महात्मा फुलेंनी गुरु मानले आणि भारतात माणसात माणूसपणाची पहिली चळवळ सुरु झाली. त्याचे प्रणेते महात्मा फुले म्हणून महात्मा फुले आधुनिक भारताचे जनक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना ज्या क्षणी गुरु मानले तो क्षण भारतीय इतिहासातील सर्वात चैतन्यमय क्षण होय असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 11 नोव्हेंबर) पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृह येथे ओबीसी प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे तसेच यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ, पुणे विभाग अध्यक्ष प्रितेश गवळी, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, रवी सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाज अध्यक्ष सतिश दरेकर, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक संतोष लोंढे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, भारती फरांदे, नारायण बहिरवाडे, शुभांगी लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे तसेच प्रा. दत्तात्रय बाळसराफ, पी. के. महाजन, ॲड. प्रियांका सुरवसे, आनंदा कुदळे, प्रताप गुरव, विशाल जाधव, वंदना जाधव, राजेंद्र करपे, ज्ञानेश्वर मुंडे, सुनिता भगत, चेतन भुजबळ, गिरीजा कुदळे, ॲड. पराग भुजबळ आदी उपस्थित होते.


यावेळी डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, सध्या देशामध्ये सर्वात अराजक स्थिती आहे. या अराजक परिस्थितीची सर्वात जास्त किंमत स्त्रीयांना मोजावी लागते. जर या देशात ब्रिटीश आले नसते, तर आणखी वाईट परिस्थिती राहिली असती. ब्रिटीश साम्राज्याने पहिल्यांदा शिक्षणाचे स्वातंत्र दिले आणि महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून पुण्यात पहिली शाळा काढली. महात्मा फुलेंना समजून घेण्यासाठी त्यांचे गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके वाचा. जगण्याला अर्थ देण्यासाठी निरर्थक जगायचे नाही. शिक्षण घ्या आणि जगण्याला अर्थ द्या हेच महात्मा फुलेंनी सांगितले. भांडवलशाही एक गरज भागविते परंतू अनेक कृत्रिम गरजा वाढविते आणि या कृत्रिम गरजा भागविण्यासाठी माणूस भ्रष्टाचार करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, एक शत्रू ब्राम्हणशाही तर दुसरा शत्रू भांडवलशाही आहे. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने लढून आपण ब्राम्हणशाही विरुध्द जिंकलो आहोत. भांडवलशाही विरुध्द अजून यशस्वी व्हायचे आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज आणि समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर माणसाला यंत्र बनविणा-या भांडवलशाही विरुध्द आता संघर्ष करायचा आहे असेही ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले.


ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके म्हणाले की, 340 कलम हे सर्व ओबीसींनी अभ्यासले पाहिजे. 1951 ला ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. महात्मा जोतीराव फुले म्हणतात 1869 साली जाती – जातीच्या संख्येप्रमाणे कामाची वाटणी करावी, म्हणजेच सामाजिक न्यायासाठी आरक्षण आवश्यक आहे. 1932 साली ब्रिटीश सरकारने दिलेले आरक्षण अनुसूचित जातींसाठी होते. हेच 10 टक्के आरक्षण ओबीसींना 54 वर्षांपुर्वी महाराष्ट्रात मिळाले. 1990 ला तत्कालीन पंतप्रधान व्हि. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करुन आरक्षण दिले. त्यावेळी आरएसएसने रथ यात्रा काढून मंडल आयोग विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे हे आरक्षण 1992 नंतर मिळाले. मंडळ आयोगाने ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावे अशी शिफारस केली असतानाही अजूनही ओबीसींना विधानसभेत आरक्षण मिळाले नाही. 1994 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसींना पंचायत राज्यापुरते (स्थानिक स्वराज संस्थांमध्ये) आरक्षण मिळाले. यामुळे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाचे 1994 ते 2021 पर्यंत 3 लाखांहून जास्त कुटूंब लाभार्थी आहेत. राजकारण हि सत्तेची गुरुकिल्ली आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे सर्व ओबीसींनी समजून घ्यावे असेही प्रा. हरी नरके म्हणाले.

ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे म्हणाले की, जे आपल्या हक्काचे आहे. त्यांची मागणी करणे म्हणजेच आरक्षणाची मागणी होय. देशाच्या साधन संपत्तीवर हक्क सांगणे. स्वातंत्र्य, समता आणि बंधूतेवर उभा राहिलेला समाज घडविण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. जाती अंताचे ध्येय गाठण्यासाठी आरक्षण हवेच. आरक्षण हे सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक आहे. हा सामाजिक न्याय माणसाच्या मनात बदल झाल्यावरच मिळतो असेही ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे म्हणाले.स्वागत ॲड. चंद्रशेखर भुजबळ, सुत्रसंचालन ॲड. दिपाली राऊत आभार पी. के. महाजन यांनी मानले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani