अखेर शाहरुख खानच्या मुलाला अटक
आर्यन खानसह ८ जणांवर गुन्हा दाखल

लोकवार्ता । प्रतिनिधी
अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने शनिवारी रात्री एका लक्झरी क्रुझवर छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी अंती आज दुपारी एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन याला अटक केली आहे. यात मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट आदींचा समावेश आहे.
एनसीबीनेे या कारवाईत, २० ग्रॅम कोकेन, ३० ग्रॅम चरस, १० ग्रॅम एमडी, आणि २० ग्रॅम टॅबलेट्स जप्त करण्यात आलं आहे. या आठजणांची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनसीबीचे समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, मला या पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होत. आपल्याकडून क्रुझरवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं स्पष्टीकरण आर्यन खानने दिलं होतं.
तर एनसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावून बोलावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.