इंद्रायणी थडी समारोपाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
लोकवार्ता : गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी थडीचे आयोजन भोसरीतील गावजत्रा मैदान येथे करण्यात आले होते. काल या यात्रेचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवांजली सखी मंच यांच्या वतीने आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप समारंभाला हजर राहून उपस्थिताना संबोधित केले.

यावेळी बोलताना इंद्रायणी थडी ही जत्रा अतिशय भव्यदिव्य आणि लाखो लोकांना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे मत व्यक्त केले. भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा अतिशय आगळावेगळा उपक्रम आहे. विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली. भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान जत्रेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महिला बचत गट आणि लघु व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ उपलब्ध होते आणि त्यातून अनेक उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन काळाची गरज असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. या जत्रेत २० लाख लोक सहभागी झाले होते ही खरच मोठी उपलब्धी असल्याचे सांगून या यात्रेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे जाहीर अभिनंदन केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार संजय शिरसाट, आमदार भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, पिंपरी- चिंचवडच्या माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि बाळासाहेबांची_शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच या जत्रेत सहभागी झालेले बचतगट आणि सर्वसामान्य नागरिक आवर्जून उपस्थित होते.