तीन अक्षरांमुळं कोका-कोलाचे ३० हजार बुडाले
एक संदेशच कोका-कोलासाठी झटका देणारा ठरला

लोकवार्ता।प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी चीनमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर वादग्रस्त कवितेतील काही ओळी टाकल्या. कवितेच्या या कडव्यामध्ये केवळ २८ अक्षरं होती. पण यामुळं त्यांना आपल्या संपत्तीतील तब्बल १८ हजार कोटींवर (२.५ अब्ज डॉलर्स) पाणी सोडावे लागले होते. आता केवळ तीन अक्षरांमुळं शीतपेयांमध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कोका-कोला कंपनीचे ३० हजार बुडाले आहेत.

कोका-कोला कंपनीला हा झटका स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्यामुळे बसला आहे. रोनाल्डो हा पोर्तुगाल संघाचा कर्णधार आहे. जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. फिटनेसच्या बाबतीतही तो नेहमीच जागृती करत असतो. त्यामुळं त्याची प्रत्येक कृती चाहत्यांसाठी महत्वाची असते. त्याने दिलेला एक संदेशच कोका-कोलासाठी झटका देणारा ठरला आहे.
युरो कपमध्ये पोर्तुगालच्या सामन्यापूर्वी रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला आल्यानंतर रोनाल्डोच्या खुर्चीसमोरील टेबलवर कोका-कोलाच्या दोन आणि पाण्याची एक बाटली ठेवण्यात आली होती. त्याकडे पाहिल्यानंतर रोनाल्डोने कोका कोलाच्या दोन्ही बाजूला सारल्या आणि हातात पाण्याची बाटली धरून ‘पाणी प्या’ (Drink Water) हे शब्द पुटपुटले .
रोनाल्डोची काही सेकंदातील ही कृती कोका-कोलासाठी मोठी नुकसानकारक ठरली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कोका-कोलाच्या शेअर्सची किंमत वेगाने खाली येऊ लागली. युरोपात दुपारी तीन वाजता शेअर बाजार सुरू झाल्यानंतर कोका-कोलाच्या शेअरची किंमत 56.10 डॉलर एवढी होती. त्यानंतर काही वेळात रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली. काही वेळातच कोका-कोलाच्या शेअरची किंमत 55.22 डॉलरपर्यंत खाली आली. त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमत सतत चढउतार सुरू राहिला. यामुळे कंपनीला सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कोका-कोलाची संयमी प्रतिक्रिया
कोका-कोला कंपनी यूरो कपची अधिकृत स्पॉन्सर आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमांत कंपनीच्या उत्पादनांचा समावेश केला जातो. रोनाल्डोच्या कृतीवर बोलताना कंपनीकडून निवदेन प्रसिध्द करण्यात आले. खेळाडूंना पत्रकार परिषद किंवा खेळादरम्यान विविध प्रकारची पेय दिली जातात. ते कोणत्या पेयाला पसंती देतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असे कंपनीने म्हटले आहे.