उरवडे; कंपनी मालक निकुंज शहाला अटक
निकुंज शहा यास १३ जूपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

लोकवार्ता।प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीस सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काल पौड पोलिसांनी एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहाला अटक करून, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल केला होता. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर आज निकुंज शहा यास १३ जूपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.

सोमवारी ही दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा प्रचंड आक्रोश दिसला होता. तेथे उपस्थित असलेल्या काहींनी सांगितले की, या कंपनीत आठ दिवसांपूर्वीच एक छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हाच काळजी घेण्याची गरज होती. जर तेव्हाच काळजी घेतली गेली असती, तर आज अशी दुर्घटना घडली नसती. आमची माणसं नाहक गेली नसती. तसेच, कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली होती.
दरम्यान, काल कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. आगीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर, उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहत इथल्या रासायनिक कंपनीतला स्फोट आणि आगीमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा, तसंच दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.