लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास -डॉ. कैलास कदम

जगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा नरेंद्र मोदी आणि भाजपला प्रश्न.

पिंपरी | लोकवार्ता-

 देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कॉंग्रेसची महत्वपुर्ण भुमिका आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची शेती आणि औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी कॉंग्रेसने केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्योत्तर काळात पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. समाजातील सर्व घटकांनाबरोबर घेऊन कॉंग्रेसने देशाचा विकास केला. आता भारत देश भकास करण्याचे काम भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

 गुरुवारी (दि. 25 नोव्हेंबर) कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी म्हाळसाकांत चौक ते तहसिलदार कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल तसेच सज्जी वर्की, उमेश खंदारे, इस्माइल संगम, नंदाताई तुळसे, छायाताई देसले, सुनिल राऊत, सतिश भोसले, झेव्हीअर अँथोनी, विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, रवी नांगरे, आबा खराडे, किरण नढे, ॲड. के. एम. रॉय, हरी नारायनन, इरफान शेख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, ॲड. अक्षय बनसोडे, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, बाबा बनसोडे, निखिल भोईर, प्रकाश पठारे, विश्वनाथ जगताप, प्रकाश नांगरे, आनंद काटे, अजय काटे, रमेश नांगरे, स्वप्निल बनसोडे, रोहित भाट, राधा काटे, निर्मल गजभिव, आशा नांगरे, सुनिता खेरमोटे, गीता यादव, देविका सुर्यवंशी, गौतम ओव्हाळ, विक्रम कुसाळकर, सुमित मंडळ, रोहन मडीकर, शेखर क्षिरसागर, युनूस बागवान, आसिफ शेख आदी उपस्थित होते.

मोर्चानंतर तहसिलदार कचेरी बाहेर सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. कैलास कदम पुढे म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात चारशे रुपयाला मिळणारा गॅस एक हजार रुपयांपर्यंत गेला आहे. पेट्रोल पन्नास रुपये लिटर होते ते आता शंभरीपार झाले आहे. गॅसवर मिळणारे अनुदान केंव्हाच बंद झाले आहे. रोज वाढत जाणा-या महागाईमुळे देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे उद्योग व कारखाने बंद होत आहेत. त्यामुळे रोज हजारो युवक बेरोजगार होत आहेत. केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्यावेत अन्यथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असणारे हे आंदोलन आणखी तीव्र करु असा इशाराही कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.

या आंदोलनानंतर तहसिलदार गीता गायकवाड यांना डॉ. कैलास कदम आणि प्रतिनिधींनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मागील सात वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशभरात महागाई आणि बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे देशातील बहुतांशी उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडलेले असताना एका रात्रीत हुकुमशाही पद्धतीने तुम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामूळे देशातील छोट्या मोठ्या सर्व उद्योग व्यवसायात आर्थिक मंदी आली आहे. त्याचा विपरीत परिणाम आता शेवटच्या घटकांपर्यंत जाणवू लागला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील जनता देखील या महागाईमध्ये होरपळून निघाली आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजीच्या किंमती रोजच वाढत आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, डाळी, तेल तसेच औषधे खरेदी करणे देखील गोरगरीब नागरिकांना कठीण होत आहे. या महागाईने देशभर हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, गरीब, मजूर, कष्टकरी, कामगार, गृहिणी, व्यापारी, लहान विक्रेता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व समाजातील सर्वच वर्ग त्रस्त झाले आहेत. पिपंरी चिचंवड उद्योग नगरीतील औद्योगिक क्षेत्राला या महागाईचा अत्यंत मोठा फटका बसला आहे. जनरल मोटर्स, रेकॉल्ड कंपनीसारख्या अनेक देशी विदेशी मोठया उद्योगांनी आपले उत्पादन प्रकल्प केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बंद केले आहेत. परदेशातील उद्योजक नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यास पुढे येत नाहीत. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत आणि सर्व सामान्य कामगार हवालदिल झाले आहे. अनेक उद्योगांनी कामगार कपात व वेतन कपातीचे निर्णय घेतले आहेत. परिणामी समाजातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अनेकजण नैराश्यामुळे आत्महत्या करीत आहेत. बेरोजगार युवक गुन्हेगारी आणि व्यसनांच्या आहारी जात आहे. अनेक ठिकाणी बाल गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. या सामाजिक, आर्थिक प्रश्नांमुळे समाज विघातक प्रकारात वाढ होऊन समाजास धोका निर्माण होत आहे. आपण याबाबत त्वरित योग्य निर्णय व उपाययोजना करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशीहि मागणी या निवेदनात केली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani