टाटांना ‘राष्ट्रहितविरोधी’ ठरविणाऱ्या विधानामुळे वादंग
‘क्या आप के जैसी कंपनी, एक दो आप ने शायद कोई विदेशी कंपनियां खरीद ली…

लोकवार्ता । प्रतिनिधी
उद्योगांनी केवळ नफ्यावर लक्ष केंद्रीत करून, देशाच्या कायद्याला जुमानत नसल्याची वृत्ती दाखविणे म्हणजे राष्ट्रीय हिताच्या विरूद्ध जाणारे पाऊल आहे, असे नमूद करीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर भाषणांत टाटा समूहाला लक्ष्य केले. गुरुवारी सायंकाळी ‘भारतीय उद्योग महासंघा’च्या वार्षिक सभेला दूरचित्रसंवाद माध्यमातून संबोधित करताना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठली असून, नव्या वादंगाला तोंड फुटले आहे.
भारतीय उद्योगांच्या व्यवसाय पद्धती या राष्ट्रीय हिताला डावलणाऱ्या आहेत, असे मत व्यक्त करताना, गोयल यांनी वारंवार आपल्या भाषणात टाटा समूहावर शेरेबाजी केली. टाटा समूहाला उद्देशून, ‘क्या आप के जैसी कंपनी, एक दो आप ने शायद कोई विदेशी कंपनियां खरीद ली… उसका महत्व ज्यादा हो गया, देश हित में काम हो गया?’ अशी गोयल यांनी टिप्पणी केली. ‘द हिंदू’ने गोयल यांचे विधान असलेले हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध केले आणि समाजमाध्यमावर चर्चेला उधाण आले.
गोयल यांच्या ध्वनीचित्रमुद्रीत भाषणाचा माहिती-महाजालातील दुवा ‘सीआयआय’कडून प्रसिद्धीमाध्यमांना वितरीत करण्यात आला होता. मात्र तो आता खासगी आणि अवरोधित केला गेला असल्याचे आढळून येते. सर्वच विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गोयल यांच्या शेरेबाजी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेतला आहे.
टाटा समूहाबद्दल गोयल यांच्या टीकेला जुलै महिन्यांत ई-व्यापारविषयक नियमांसंदर्भात उद्योगजगताच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीची पार्श्वभूमी आहे. त्या बैठकीत केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ई-व्यापारविषयक नियमांचा या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल, असे नमूद करीत टाटा समूहाने घेतलेल्या आक्षेपाचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. व्यवसायात भागीदार असणाऱ्या ‘स्टारबक्स’ला टाटांच्या ई-विक्रय संकेतस्थळावरून त्यांची उत्पादने विकण्यापासून प्रतिबंधित केले जावे, हे विपरीतच आहे, अशा आशयाच्या टाटा समूहाने केलेल्या टीकेचे प्रत्युत्तर गोयल यांनी अशा तऱ्हेने दिल्याची चर्चा आहे.
‘सीआयआय’द्वारे आयोजित या सभेत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हेही उपस्थित होते. प्रस्तावित ई-व्यापारविषयक नियमांवरील टाटांकडून आलेल्या आक्षेपामुळे आपण दुखावलो आहोत आणि तसे आपण चंद्रशेखरन यांनाही कळविले आहे, असे गोयल पुढे स्पष्टपणे बोलूनही गेले.
टाटा समूहाने गोयल यांच्या ताज्या थेट टिप्पणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘सीआयआय’सह, उद्योगजगतानेही गोयल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. मात्र विरोधी नेत्यांनी, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी गोयल यांनी टाटांना खलनायक ठरवून, भारतीय उद्योगक्षेत्रावरच केलेला हा हल्ला असल्याचे मत नोंदविले आहे.