२ डोस घेऊन पण ८७ हजार लोकांना कोरोना !
४६ टक्के रुग्ण हे एकटय़ा केरळ राज्यातील

लोकवार्ता । प्रतिनिधी
देशभरात लसीचे दोन डोस घेतलेल्या जवळपास ८७ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४६ टक्के रुग्ण हे एकटय़ा केरळ राज्यातील आहेत, तर उर्वरित ५४ टक्के कोरोनाग्रस्तांची देशाच्या वेगवेगळ्या भागांत नोंद झाली आहे. या आकडेवारीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चिंता भलतीच वाढली आहे.
देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. गुरुवारीही ४० हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण आढळले. देशभरातील रुग्णवाढीतील या घसरणीमुळे सरकारला दिलासा मिळत आहे. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोना संसर्ग होत असल्याने हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत केरळच्या आकडेवारीने सरकारला सर्वाधिक धडकी भरवली आहे. केरळातील ब्रेकथ्रू इन्फेक्शनच्या २०० नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही नवीन व्हेरिएंट किंवा म्युटेशनचा उलगडा झालेला नाही.
म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर ब्रेकथ्रू इन्फेक्शन आणि विषाणूच्या ट्रान्समिशनवर सरकारची विशेष नजर आहे. केरळ, कर्नाटक, तामीळनाडूमध्ये होत असलेल्या ट्रान्समिशनवरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कर्नाटकमध्ये गेल्या आठवडय़ात १२ हजार ब्रेकथ्रू इन्फेशनचे रुग्ण होते.