देशात कोरोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट
४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण

लोकवार्ता । प्रतिनिधी
देशात थैमान घातलेल्या कोरोनाच्या लाटेला ओहोटी लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी देशात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

यात आणखी एक मोठा दिलासा म्हणजे कोरोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाटे शिगेवर पोहोचल्यानंतर देशात दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृतांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.