कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र कुदळवाडीत सुरू होणार
कुदळवाडी परिसरात २० हजार नागरिक वास्तव्य करतात

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : कुदळवाडी परिसरात २० हजार नागरिक वास्तव्य करतात. याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने अद्याप लसीकरण केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चिखली येथे लसीकरणासाठी जावे लागते. मात्र आता कुदळवाडी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आता लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिली. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, फ–क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांनी लसीकरण केंद्राच्या जागेची शुक्रवारी पाहणी केली. कुदळवाडी येथील नवीन मनपा शाळेच्या इमारतीत केंद्र सुरू होत आहे. त्यासाठी स्थापत्य विभागाशी संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. येत्या १० ते १५ दिवसांमध्ये लसीकरण केंद्राचे काम पूर्ण होईल, असे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
महापालिका प्रशासनाकडे मागणीच्या तुलनेत लस साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र, नागरिकांनी संयम ठेवावा. कुदळवाडी परिसरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण सुलभ व्हावे. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. नवीन लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील अबालवृद्धांची पायपीट थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.