लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

नाशिकतील लाचखोर महिला शिक्षणाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे ACB ची धडाकेबाज कारवाई

लोकवार्ता । प्रतिनिधी

नाशिक : बुधवारी नाशिकमध्ये ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान पथकानं त्यांच्या घराची झडती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. झनकर यांच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.

मंगळवारी संध्याकाळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी झनकर यांना ताब्यात घेतलं. मात्र सूर्यास्तानंतर महिलेला कायद्यानं अटक करता येत नाही. त्यामुळे नातेवाईकांना समन्स देत सकाळी ताब्यात देण्याच्या हमीवर मध्यरात्री पथकानं त्यांची सुटका केली. सकाळी पुन्हा हजर होण्याचे निर्देश त्यांना दिले होते. मात्र या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्या होत्या. त्यानंतर ठाणे एसीबीनं धडाकेबाज कारवाई केली आहे.

फरार झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर-वीर पोलिसांच्या ताब्यात असून ठाणे ACB पथकानं त्यांना अटक केली आहे. झनकर यांना अटक करण्यात ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमला यश आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वैशाली यांचा शोध सुरु होता. अधिकारी पल्लवी ढगे यांनी त्यांना अटक केली आहे. वैशाली यांना आज न्यायालयात हजर करणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी डॉ. वैशाली यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच ठाणे ACB नं त्यांना ताब्यात घेतलं आहे.

झनकरांची लाखोंची संपत्ती
झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये ३१.७० गुंठे, १०.८ गुंठे, ४०.८० गुंठे, १३.१० गुंठे तर सिन्नर येथे ०.५६ गुंठे, ३.४१ गुंठे, २२.७० गुंठे, अशी एकूण सुमारे १२३.६४ गुंठे म्हणजेच सुमारे ३ एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. ४० हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत.

घराच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इत्यादी बँकांचे पासबुक जप्त केलेत. याच दरम्यान पथकानं शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले, प्राथमिक शाळेतील शिक्षक पंकज रमेश दशपुते यांच्याही घराची झडती घेतली.

काय आहे नेमकं प्रकरण
शाळांना मंजूर करण्यात आलेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी ९ लाख रुपयांची मागणी केली होती. पण तडजोडीनंतर आठ लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. यानंतर संबंधित संस्थाचालकानं याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागानं तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर, सापळा रचून आरोपी शिक्षणाधिकाऱ्याच्या हस्तकाला अटक केली.

मंगळवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांचा शासकीय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा आठ लाख रुपयांची रक्कम स्विकारण्यासाठी जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला. यावेळी त्याने तक्रारदार संस्थाचालकाकडून ८ लाख रुपयांची रक्कम स्विकारली. ही रक्कम स्विकारताच पथकानं झनकर यांच्या वाहनचालकास रंगेहाथ पकडलं आहे. त्याची कसून चौकशी केली असता, तो शिक्षणाधिकारी झनकर यांच्या सांगण्यावरून ही रक्कम घेतल्याचं सांगितलं.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani