25 वर्षांमध्ये पवना बंद जलवाहिनीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, शेतकर्यांवर गोळीबार- एकनाथ पवार
-एकनाथ पवार यांचे मंगला कदम यांना सणसणीत उत्तर .
पिंपरी । लोकवार्ता-
गेल्या पंचवीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडला. राष्ट्रवादीने पवना बंद जलवाहिनी प्रकल्पात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर गोळीबार करीत एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा आरोप महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, महापालिकेत 25 वर्षे सत्ता असताना राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा एकही प्रश्न मार्गी लावला नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षात आंद्रा व भामा आसखेड पाणी योजनेला प्राधान्य देऊन प्रकल्पास तत्काळ मंजुरी दिली गेली. ते काम वेगात सुरूही केले. निघोजे, तळवडे येथील उपसा केंद्रातून इंद्रायणी नदीतील 100 एमएलडी उचलून ते पुढील महिन्यात शहरातील नागरिकांना दिले जाणार आहे. मात्र, सर्वसामान्यांशी घेणे-देणे नसलेल्या राष्ट्रवादीने गेल्या 25 वर्षांपासून ठेकेदारी करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार करीत मलिदा लाटला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या माध्यमातून मंगला कदम ज्या प्रभागात अनेक वर्षापासून नेतृत्व करीत आहेत, त्या प्रभागात आजही पाण्याची गैरसोय होत आहे. येथील नागरिकांना खासगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. हेच का तुमचे काम ? असा सणसणीत टोला एकनाथ पवार यांनी लगावला आहे.