१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना आजपासून बूस्टर डॉस
लोकवार्ता : केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारपासून (दि.१५) बूस्टर डॉस दिला जाणार आहे.

हा डॉस १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील ८ केंद्रांवर त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.यापूर्वी केवळ हेल्थकेअर वर्कर, फ्रँटलाइन वर्कर आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाच हा डोस देण्यात येत होता. तर १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन बूस्टर डोस घेता येत होता. मात्र, त्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये ठराविक शुल्क भरावे लागत होते.
आता केंद्र सरकारने नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी ७५ दिवसांची विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत आता १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनाही सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस मिळणार आहे. शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय बूस्टर डोस घेण्यासाठी ८ केंद्रांची सोय करण्यात आली आहे. या केंद्रांवर १४ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्याची सुविधा असेल. तर, १८ वर्षावरील लाभार्थ्यांना बूस्टर डोस घेण्याची सोय केली आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस घेण्याची सोय देखील या केंद्रांवर असणार आहे. त्याशिवाय, १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोबेव्हॅक्स या कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची सोय आहे. केंद्रनिहाय प्रत्येक लसीचे ५०० डोस त्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे.