कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या बैलांना गुंगीचे औषध देऊन बैलाचा मृत्य; गोरक्षकांनी केले महापालिकेसमोर आंदोलन
लोकवार्ता : मोकाट जनावरांना कत्तलीसाठी गुंगीचे औषध देऊन गाडीमध्ये घालून त्यांची चोरी करण्याचा संतापजनक प्रकार पिंपरी येथील सुदर्शन चौक येथे शनिवारी (ता.१७) उघडकीस आला आहे.

चोरी करणाऱ्या समाजकंटकांनी चार वर्षाच्या बैलाला भूल दिली होती. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार असणारे पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्यावर कारवाईची करण्याची मागणी आता गोरक्षकांकडून करण्यात येत आहे. गोरक्षकांकडून आज (ता.१८) पिंपरी चिंचवड महपालिका भवनातील मुख्य प्रवेशद्वारा समोर मृत बैला समवेत आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री अभिजीत शिंदे, पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण, अमित कुदळे, गणेश मंजाळ, प्रतीक खराडे, दीपक मुंगसे, नितीन कुदळे, विठ्ठल जाधव, मंगेश नढे, क्रषी ढाकणे, महेश आढाव आदी गोरक्षक उपस्थित होते. पिंपरी येथे मोकाट जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने भुलीचे इंजेक्शन देऊन स्विफ्ट डिझायर कारमध्ये गाय व वासराला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गोरक्षक प्रदिप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांना मिळाली. गोरक्षक घटनास्थळी पोहचले.
यावेळी वासराची परिस्थिती गंभीर होती. याबाबतीत पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे तसेच मानद पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण यांच्यासोबत गोरक्षक प्रदीप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्या मार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्यामुळे बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असे अभिजीत चव्हाण यांनी सांगितले. या संतापजनक व दुखःद घटनेनंतर पिंपरीतील गोरक्षकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली असून पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगड यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.