विरोधकांकडून लोकांची फसवणूक
जर एखाद्या राजकीय पक्षाने वचन दिले असेल तर ते पाळायचे असते

लोकवार्ता । प्रतिनिधी
नागरिकांच्या हितासाठी कठीण आणि मोठ्या निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण गेल्या काही दशकांत असले निर्णय घेतले गेले नाही. विरोधी पक्ष हे बौद्धिक अप्रामाणिकपणा करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
कृषी कायद्यांचे समर्थन करताना त्यांनी सांगितले, की जर एखाद्या राजकीय पक्षाने वचन दिले असेल तर ते पाळायचे असते. विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांबाबत आश्वासन दिले होते, पण केले मात्र काहीच नाही. आम्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केले आहेत. विरोधकांनीच दिलेल्या आश्वासनांवर आता ते गैरप्रचार करीत आहेत.
‘ओपन’ या नियतकालिकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की दशकभरापूर्वी जे फायदे लोकांना मिळायला पाहिजे होते ते त्यांना मिळाले नाहीत. लोकांना व देशाला मिळणे अपेक्षित असलेल्या गोष्टी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करायला लावणे चुकीचे आहे. त्यासाठी आम्ही निर्णय घेतले. यापुढील काळात ठोस व कठोर निर्णय घेतले जातील.
ते म्हणाले, की कोविड काळात भारताने विकसित देशांइतकीच चांगली कामगिरी करूनही काहींनी नकारात्मक प्रचार केला. देश संकटाला एकजुटीने सामोरे जाण्यास शिकला आहे. गरजेच्या वेळी अनेकांनी क्षमता सिद्ध केल्या.
शेतकरी संघटनांशी चर्चेस आधीपासूनच तयार
पंतप्रधान म्हणाले, की आमचे सरकार सुरुवातीपासून शेतकरी आंदोलक संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे. अनेक बैठका याबाबत झाल्या, पण अजून कुणीही आक्षेप नेमका काय आहे, हे सांगितलेले नाही. भारताच्या राजकारणात चालू सरकारच्या आधारे पुढील सरकार कसे बनवता येईल या प्रारूपावर भर दिला जातो. आम्ही मात्र देशाच्या बांधणीसाठी सरकार चालवत आहोत. आपला पक्ष विजयी कसा होईल हेच इतर पक्ष पाहतात. पण आम्ही आमचा देश कसा जिंकेल यासाठी सरकार चालवित आहोत,