‘हे सरकार इतकं लबाड आहे’ की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात
आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले.
पिंपरी।२५ ऑक्टोबर लोकवार्ता-
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

राज्याने गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे राज्याचं अतोनात नुकसान झालं. याची झळ बसली ती मुख्यतः राज्यातल्या बळीराजाला. या नुकसानीची भरपाई योग्य त्या प्रमाणात न मिळाल्याने विरोधी पक्षाने आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाईचा मुद्दा हा भाजपाच्या प्रचारातल्या मुद्द्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार असं चित्र दिसत आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले, “हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत”