“देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील महत्व कमी”
-राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक टीका
पुणे।लोकवार्ता-
देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील महत्त्व कमी होताना दिसते आहे. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक विनोद तावडे हे मोठे होत आहेत. ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होत आहेत. दोनतीन राज्यांची जबाबदारी तावडेंकडे सोपविण्यात आली आहे, अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंगळवारी येथे टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नबाब मलिक यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, फडणवीस सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. सत्ता मिळविण्यासाठी ते काहीही करू शकतात. दोन वर्षानंतर त्यांनी परिस्थिती स्वीकारली आहे, असे दिसते आहे. भाजपमधील त्यांचे अंतर्गत विरोधक असलेले विनोद तावडेंसारखे लोक मोठे होऊ लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण बदलतंय असं दिसून येतआहे. ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. यातूनच फडणवीस यांचे पक्षातील महत्त्व कमी होत आहे, हे दिसून येत आहे.
राज्य सरकाराला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. करोना संसर्ग काळातही सरकारने कोणताही प्रकल्प रद्द केला नाही. महागाई, बेरोजगारीमध्येही अनेकांना रोजगार दिला, असेही मलिक यांनी सांगितले.