उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत मराठा आरक्षणाविषयी चर्चा
उद्धव ठाकरे सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सदन येथे पोहचले

लोकवार्ता।प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ नुकसानभरपाई, जीएसटी भऱपाई थकबाकी अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पवारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांबरोबरच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा समावेश असून आज ते मोदींची भेट घेणार आहेत.
सोमवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उद्धव ठाकरे मोदींची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल,” असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा…
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ मुंबईहून विमानाने दिल्लीकडे रवाना होतील. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सदन येथे पोहचले. त्यानंतर सकाळी ११ वाजता पंतप्रधानांसोबत लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानी हे शिष्टमंडळ मोदींची भेट घेतली. बैठकीनंतर लगेच हे शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना होतील.