राजगडावर ‘रोप वे’ बांधण्याच्या वृत्तानंतर दुर्गप्रेमींकडून नाराजी
रोप वे मुळे कसे नुकसान होऊ शकते हे आपल्या पत्रातून मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले

लोकवार्ता । प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी असणारा राजगड आणि कार्ला येथील एकविरा देवीचे मंदिर येथे जाण्यासाठी रोप वे बांधण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित झाला. या दोन्ही ठिकाणी ‘रोप वे’ बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने पुढाकार घेतल्यामुळे राज्यात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

राजगडावर रोप वे बांधण्याच्या वृत्तानंतर दुर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रोप वे झाल्यानंतर राजगडावर येणारा ताण विचारात घेता राजगडाचा सिंहगड करू नका, असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे. यामुळे वाढणाऱ्या पर्यटनाच्या माध्यमातून राजगडाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा विचार करावा असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे.
अनेक दुर्गप्रेमी मंडळे, संस्था तसेच गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमींनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. एकविरा देवीच्या ‘रोप वे’पेक्षा राजगडावरील प्रस्तावित रोप वेला अधिक विरोध करण्यात येत आहे. त्यातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका छोट्या दुर्गप्रेमीने पत्र लिहिले आहे. पत्रात या लहान मुलीने आदित्य ठाकरेंकडे रोप पे प्रकल्प बांधू नका अशी केविलवाणी विनंती केली आहे.
माननीय आदित्य दादा यांना पत्रास कारण की राजगडावर रोप वे बांधू नका. कारण गडावर आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरे असतात. आपण गर्दी केली हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका Please. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरामागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ पुणे, असे या पत्रात म्हटले आहे.
या लहान गडप्रेमी मुलीने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत रोप वे मुळे कसे नुकसान होऊ शकते हे आपल्या पत्रातून मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.